केवळ ३७ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीची ओळख



मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा अहवाल सादर ; प्रथम संस्थेच्या अहवालात अनेक खुलासे
प्रतिनिधी
मुंबई
महापालिका शाळेत शिकणाऽया तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा तपासण्यात आला असून यामध्ये केवळ ३७ टक्केच विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे ३॰ टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या इंग्रजीच्या वाक्याचे अर्थ कळत असल्याचे सर्वेक्षणामध्ये समजले आहे. प्रथम या संस्थेच्यावतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दजार्बाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जाहीर जाला आहे.
  प्रथम संस्थेच्यावतीने देशातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रत्येकवर्षी अहवाल तयार करण्यात येतो. प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलून सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना गणित, प्रथम भाषा, इंग्रजी, हिंदी आणि सामान्य ज्ञानाबाबत प्रश्न विचारण्यात येतात. ही सर्व माहिती गोळा करून त्याची एकूण टक्केवारी काढण्यात येते. यंदा प्रथम संस्थेच्यावतीने मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऽया विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा तपासण्यात आला. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे जाले आहेत. मुंबई महापालिका शिक्षणावर प्रत्येकवर्षी करोडो रुपये खर्च करते. मात्र, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा पाहिला तर हा करोडो रुपयांचा निधी जातो कुठे? असा सवाल यावेळी उपस्थित होतो.
  तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी आणि भागाकाराची गणिते देण्यात आली होती. त्यामध्ये ७३ टक्के विद्यार्थ्यांना ही गणिते सोडविता आली. केवळ ६३ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत असणारी गोष्ट वाचता आली. पहिली आणि दुसरीच्या केवळ ३९ टक्के विद्यार्थ्यांना अंक ओळखता आले. तर ४६ टक्के विद्यार्थ्यांना वर्णमालामधील शब्द ओळखता आले असल्याचे निष्कर्ष प्रथम संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. हा अहवाल तयार करण्यासाठी पहिलीच्या ४९ हजार १९५ विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. तिसरी ते पाचवी असे मिळून ७९ हजार ५३४ विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश आहे. हे सर्वेक्षण २५ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान करण्यात आले.

Comments