खासगी शाळेतील शिक्षकांची निवड यादी रद्द

पवित्र प्रणालीतील शिक्षक करणार आंदोलन

पुणे
प्रतिनिधी
राज्यात ‘पवित्र पोर्टल’मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीची दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया तयारी सुरू झाली असून या प्रक्रियेतुन खासगी शाळेतील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येत असताना काही त्रुटी राहिल्या होत्या. या त्रुटींची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कशाप्रकारे राबविण्यात येईल, यासंदर्भातील प्रक्रिया शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली. यात बृहन्मुंबई मनपा शाळा, उर्दू माध्यमाच्या शाळांतील रिक्‍त पदे, खासगी संस्थांमधील पदांची निवडयादी, माजी सैनिक प्रवर्गातील रिक्‍त पदांची निवडयादी, मुलाखतीसह खासगी संस्थामधील पदांसाठीची निवडयादी या सर्व घटकांचा विचार करूनच शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. परंतु कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली1981 नुसार सुधारित शिफारस पात्र यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी मुलाखतीशिवाय निवडीसाठी यादी रद्द करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना यापूर्वी  50 टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत. अशा उमेदवारांकडून किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर अशा उमेदवारांकडून मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय पदांसाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.

उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्‍त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्‍त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. शिल्‍लक राहिलेली समांतर आरक्षणासह आरक्षित पदे खुल्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणासह दर्शविण्यात आलेली आहेत. त्यामुळे खुला प्रवर्ग विचारात घेऊन पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या निवडयादीमध्ये शिफारस झालेली नाही. अशा सर्व पात्र उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवाराचा रिक्‍त पदावरील पद भरतीसाठी विचार केला जाणार नाही. रिक्‍त पदे खुल्या प्रवर्गातून नव्याने भरण्यात येणार असल्यामुळे पात्र सर्व उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. उर्दू माध्यमातील माजी सैनिकांची सर्व रिक्‍त पदे खुल्या प्रवर्गामध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे इंग्रजी माध्यमाच्या मुंबई पब्लिक स्कूल व प्राथमिक शिक्षण विभाग या दोन प्रकारच्या शाळा असल्याने इंग्रजी या एकाच माध्यमामध्ये नोंद केल्यामुळे एकत्रित निवडयादी प्रसिद्ध झाली. त्यामुळे नियुक्‍ती प्राधिकार्‍यांनी मुंबई पब्लिक स्कूलसाठी उपलब्ध झालेले उमेदवार वगळता दोन्ही शाळांतील उर्वरित रिक्‍त पदासाठी स्वतंत्र निवडयादी देण्याची मागणी केली. त्यामुळे मुंबई पब्लिक स्कूलसाठी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवारच पात्र राहतील. प्राथमिक शिक्षण विभागासाठी केवळ डीएड, बीएड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार पात्र राहतील. त्यानुसार मुंबई पब्लिक स्कूल व प्राथमिक शिक्षण विभाग यासाठी दोन स्वतंत्र याद्या तयार करण्यात येत आहेत. संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार प्रथम इंग्रजी माध्यमातील मुंबई पब्लिक स्कूल शाळांसाठी केला जाईल. असा विचार केल्यानंतर निवड न झालेल्या उमेदवारांना इतर उमेदवारांसह प्राथमिक शिक्षण विभागाच्या रिक्‍त पदांसाठी विचारात घेतले जाणार आहे.

Comments