शिक्षकांना विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी लागू,शिक्षण विभागाने जारी केला अध्यादेश


12 व 24 वर्षे सेवा करूनही कित्येक वर्षे वरिष्ठ व निवडश्रेणीपासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या शिक्षकांना विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्याचा अध्यादेश अखेर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मागील तीन वर्षांतील वर्गांचा निकाल तपासून या शिक्षकांना पगारवाढ देता येईल का, याविषयी अहवाल तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. शिक्षक वर्तुळातून या निर्णयाला कडाडून विरोध झाला. शाळेचा किंवा विद्यार्थ्यांचा निकाल केवळ शिक्षकांवर अवलंबून नसून इतर बाह्यघटकही त्यासाठी कारणीभूत असतात, असा सूर उमटू लागताच शिक्षण आयुक्त विनोद सोळंकी यांनी या सूचनाच रद्द केल्या.
वाढीव वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची अट होती. तसेच शाळेच्या भौतिक सुविधाही ग्राह्य धरण्यात येत होत्या मात्र आता या सर्व अटी रद्द करीत शिक्षण विभागाने वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने जाहीर करावी तसेच श्रेणी मंजूर करताना शिक्षकांचे मागील दोन वर्षांचे समाधानकारक गोपनीय अहवाल विचारात घ्यावेत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

Comments