शिक्षकांना पूर्ण दिवस शाळेबाहेर उभे ठेवले




वेतन कापण्याची दिली होती धमकी ; विद्यार्थी नसतांना शाळेत बोलविले
मुंबई
प्रतिनिधी
राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले असून मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळेत उपस्थित रहा अन्यथा वेतन कपात करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे बुधवारी शिक्षक शाळेत पोहोचले मात्र अनेक शाळांचे रूपांतर कोरोना विलगीकरण कक्षात केले असल्यामुळे शिक्षकांना पूर्ण दिवस शाळेबाहेर उभे ठेवण्यात आले. काही शिक्षकांना जवळच्या शाळेत तर काहींना वार्ड ऑफिसमध्ये बसविण्यात आले असल्याचा अजब प्रकार बुधवारी घडला. विद्यार्थी शाळेत नसतांना शिक्षकांना का बोलाविण्यात येत आहे ? असा संतापजनक सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला.
कोरोना प्रभाव राज्य आणि मुंबईत झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकारने प्रत्यक्ष शाळा सुरू न करता शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेतील शिक्षकांनी शाळेत तात्काळ हजेरी लावण्याची सक्ती केली. त्याचप्रमाणे शाळेत उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्यात येणार असल्याची धमकी यावेळी दिली त्यामुळे शिक्षकांनी बुधवारी शाळेत धाव घेतली. शाळेत गेल्यावर त्यांना कळाले की याठिकाणी कोरोना विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला नाही. शिक्षकांना मात्र शाळेत राहण्याचे आदेश असल्यामुळे पूर्ण दिवस शाळेच्या बाहेर उभे रहावे लागले.
यासंदर्भात शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे म्हणाले की, विलगीकरण कक्षाच्या बाहेर शिक्षकांना बसविणे खूप धोक्याचे आहे. काही ठिकाणी जवळ शाळा नसले तर वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन बसण्यास सांगितले आहे. पण शिक्षकांना शाळा नसताना, येऊन येऊन बसण्याचा हट्ट का ? शाळेत साधे सॅनिटायझर पण नाही. शासनाने मोघम जी. आर. काढून गोंधळ घातला आहे. १० शाळांमागे एक आरोग्यपथक कधी होणार ? शिक्षकांची आरोग्य तपासणी वगैरे तरतुदी मोघम असून शाळेत शिक्षक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. कोणतीही सुविधा नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाने काहीही सुविधा पुरवलेली नाही. पगार कापण्याच्या भीतीने गावावरून येण्यासाठी १५ ते २० हजार रुपये  खाजगी वाहने घेत आहेत. त्यामुळे गावावरून येण्यासाठी मुंबईतील शिक्षकांना अजून १५ दिवसांची मुदत मिळावी, आणि  काही कामे घरातूनच करण्याची परवानगी मिळावी. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सक्तीने बोलावले जात आहे. त्यांना विरार, बदलापूर कल्याण वसई पालघर येथून येण्यासाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत. महिला कर्मचाऱ्यांना सकाळी काही ठिकाणी शाळेत हजर होण्यास सांगत सांगितले जात आहे. महिला शिक्षकांनी प्रश्न केले आहे की कुणाच्याही खाजगी वाहनात कसे बसावे? सुरक्षिततेचे काय? तिची सुरक्षितता कोण घेणार असे विविध सवाल यावेळी उपस्थित होतात त्यामुळे सर्व शाळा १५ ऑगस्टनंतर सुरू कराव्यात अशी मागणी दराडे यांनी यावेळी केली.

Comments