केजी ते दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरूच



शाळांकडून शिक्षण विभागाचे आदेश धाब्यावर ;शाळांकडून फीसाठी तगादा 
मुंबई
प्रतिनिधी
पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असतांनादेखील मुंबईतील अनेक शाळा शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला धुडकावत केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे यासाठी शाळा मोठ्याप्रमाणात शुल्क आकारात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू न करता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षण कसे आणि किती वेळ द्यावा याची एक नियमावली शिक्षण विभागाच्यावतीने तयार करण्यात आली आहे. केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना पालकांनी शिकवावे आणि त्यापुढील म्हणजेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास शिकवायचे आहे. असे नियम असतांना मुंबई - ठाण्यातील केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास ऑनलाइन शिक्षण देत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वय खूप कमी असल्यामुळे ते एकाच ठिकाणी चार तास बसू शकत नाही. त्याचप्रमाणे अन्य वर्गांचे ऑनलाईन अध्ययन हे कमाल तीन तास असून, त्यातही विद्यार्थ्यांना ब्रेक देण्याच्या सूचना याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन वर्गाचे नियम धाब्यावर बसवण्याबरोबरच काही शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आल्याने तातडीने शुल्क भरण्यात यावे असा तगादा पालकांच्या मागे लावला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या असतानाही अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने ऑनलाईन वर्ग घेत शुल्क वसुली करण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत.

Comments

  1. शिक्षणाचा व्यवसाय करणाऱ्यां कडुन पुन्हा काय अपेक्षा असणार ? पैसा कमावणे हे एक प्रमुख उद्देश ठेवूनच शाळा सुरू केल्या. आता कोरोना मुळे त्या उद्देशावर तात्पुरत्या स्वरुपात वचक होता पण आता पुन्हा तेच.....

    ReplyDelete

Post a Comment