जुलैमध्ये होणारी परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली
मुंबई
प्रतिनिधी
कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे जुलै महिन्यात देशभरात आयोजित करण्यात आलेली नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शुक्रवारी केली. नीट आणि जेईई परिक्षाबाबत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने गुरुवारी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर शुक्रवारी पोखरियाल यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे परीक्षेला कसे जायचे असा सवाल पालकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे या परिक्षाबाबत समिती नेमण्यात आली होती.
व्यवसायिक आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असणारी जेईई आणि नीट परीक्षा बंधनकारक असते. ही परीक्षा मे महिन्यात आयोजित करण्यात आली होती मात्र लॉकडाऊन वाढवल्यामुळे ती जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रभाव अद्यापही जैसे थे असल्यामुळे ही परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे पोखरियाल यांनी जाहीर केले. जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असून जेईई ऍडव्हान्स 27 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली
जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात यावी की नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे प्रमुख विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल गुरुवारी रात्री दिला आणि त्यानुसार पोखरियाल यांनी शुक्रवारी या जेईई आणि नीट परीक्षा बाबत निर्णय जाहीर केले.
Comments
Post a Comment