भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन यांना फाशी
मुंबई
प्रतिनिधी
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये कानामात्राच्या चुका असतात हे सर्वच मान्य करतात मात्र आता मंडळाने चक्क चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात या नावांमध्ये घोळ झाल्याची चूक निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील चूक ही ‘गाढव चूक’ असून निंदनीय असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच हे पुस्तक त्वरित मागे घ्या आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी दवे यांनी केली आहे. दुसरीकडे “ या प्रकरणाची शहानिशा करून चौकशी व्हावी. ही छपाईची चूक असू शकते, जाणूनबुजून कोणी केले असेल, असे वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. एकूणच या मुद्द्यावरून वाद वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे उल्लेख?
“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
“बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…
Comments
Post a Comment