शिक्षण सेवकांना वेतन परत करण्याची नोटीस

टीईटी - सीटीइटी पास करण्यास मुदतवाढ द्या
मुंबई
प्रतिनिधी
शहरातील शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षण सेवकांना 30 मार्च 2019 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी आणि सीटीईटी ) पास करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र अनेकांनी मुदतीनंतर परीक्षा पास केल्यामुळे त्यांना वेतन परत करण्याची नोटीस शाळांकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा त्यांना नियमित नियुक्ती देण्यास नकार देत आहे त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई महापालिका शिक्षक सेनेकडून करण्यात आली आहे.
देशभरातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षक आणि शिक्षण सेवकांच्या नियुक्तीसाठी सीटीईटी आणि टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक आणि शिक्षण सेवकांना ही परीक्षा पास करण्याची तीन मुदत देण्यात आली होती. 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी परीक्षा पास करण्याची संधी यावेळी देण्यात आली होती. मात्र अनेक शिक्षण सेवकांनी ही परीक्षा सरकारच्या मुदतीनंतर पास केली त्यामुळे त्यांना नियुक्ती देण्यास शाळांनी नकार दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांना वेतन परत करण्याची नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे शिक्षण सेवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे या जीआरचा संदर्भ घेत सहाय्याक शिक्षकांना नियुक्ती देण्यास शाळा नकार देत आहे. अनेक शिक्षकांना सेवा समाप्ती आणि वेतन परत देण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण सेवक आणि सहाय्यक शिक्षकांना न्याय देण्यासाठी टीईटी - सीटीईटी परीक्षा पास करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई महापालिका शिक्षक सेना यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Comments